अहमदनगर

अतिक्रमणांनी गुदमरला अंगणवाडीचा श्‍वास

अतिक्रमणांनी गुदमरला अंगणवाडीचा श्‍वास
नागरदेवळे येथील प्रकार ः जिल्हाधिकार्‍यांकडे अतिक्रमणे काढण्याची मागणी

नगर, दि. 1 (प्रतिनिधी) -नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील द्वारकाधिश कॉलनी येथील प्रिंस टॉवरजवळील अंगणवाडी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून, ही अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील द्वारकाधिश कॉलनीजवळील प्रिंस टॉवरजवळ अंगणवाडी आहे. सध्या ही अंगणवाडी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली आहे. अंगणवाडी मुख्य रस्त्याच्या कडेला असल्यामुळे परिसरात तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे. मात्र हे तारेचे कंपाउंड तोडून काही व्यक्तींनी तेथे चिकन व मटणाचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना खेळण्यासाठी जागा कमी पडत आहे. या चिकन व मटणाच्या हातगाड्यामुळे अंगणवाडी झाकून गेली आहे. दुसर्‍या बाजूने प्रिन्स टॉवरच्या मालकाने अंगणवाडीच्या भिंतीला चिटकूनच अनधिकृत गाळे बांधले आहेत. त्यामुळे अंगणवाडीची एक खिडकी या अनधिकृत गाळ्यांमुळे कायमची बंद झाली आहे. याबाबत ग्रामसेवक व सरपंचांकडे तक्रार केली असता, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनधिकृत गाळे बांधणारी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्याची नातेवाईक आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यात यावीत. अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य स्नेहल तागडकर, दीपाली गारदे, रोहित भुजबळ, महेश झोडगे, शोभा गोंधळे, काजल जाधव, सोनाली भंडारे, सूर्यकांत पाखरे, रोहिणी जगताप आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button