अरे बापरे ! नवविवाहितेवर जादूटोण्याचा प्रयत्न ?

अहमदनगर : तू अपशकूनी आहेस. तुझ्यामुळे तुझी सासू मयत झाली. असे आरोप करत नवविवाहित तरूणीचा छळ केला . तसेच ती घरातून निघून जाण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोणा करण्यात आल्याचा गंभीर प्रकार राहुरी तालुक्यात समोर आला असून ,या प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील डॉक्टर पती व मांत्रिकासह एकूण सहाजणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, सदर पीडित तरूणीचा विवाह फेब्रुवारी २०२० रोजी श्रीरामपूर येथील एका डॉक्टरसोबत झाला होता. ती सासरी नांदत असताना तिची सासूचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर सासरच्या लोकांनी पीडित तरूणीस तू अपशकूनी आहे. तू येथे नांदायला आल्यामुळेच तुझी सासू मयत झाली. असे आरोप करून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिच्या सासरच्या लोकांनी एका मांत्रिक बाबाला बोलावून तीच्यावर काळा जादूटोण्यासारखा प्रकार सुरू केला. तिच्या डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहुलीला चिटकविणे, अमावस्येच्या रात्री अकरा वाजे नंतर राखेचे गोल रिंगण करुन त्यात तीला बसवून मंत्र उच्चार करणे असे प्रकार तिच्यावर करण्यात आले. तू उपचार करून घेतले नाही तर घरात वाईट प्रकार घडत राहतील. अशी धमकी दिली. माहेरच्या लोकांना काही टेन्शन नको म्हणून तिने कोणाला काही सांगितले नाही. मात्र, पीडितेच्या वडिलांनी तिच्याकडे काळी बाहूली, लिंबू व तावीत अशा वस्तू पाहिल्यावर हा काय प्रकार आहे? असे विचारले असता सर्व प्रकार त्यांना समजला. त्यांनी तात्काळ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती अहमदनगरचे पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला व त्यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मांत्रिकासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.