अहमदनगर

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर : कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी एका कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तपोवन रोड परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी गोरख तांदळे, रमेश तांदळे (पूर्ण नावे माहिती नाही, रा. लेखानगर) यांच्याविरोधात विनयभंग, शिवीगाळ, मारहाण, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत कुटुंबातील महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह तपोवन रोड परिसरात राहते. ते कुटुंब मजुरी काम करून आपला उदरनिर्वाह करते. फिर्यादी महिलेचा पती तांदळे यांच्याकडे मजुरी कामासाठी गेला होता. या कामाचे पैसे मागण्यासाठी फिर्यादी महिलेच्या पतीने रमेश तांदळे याला फोन केला. यावेळी रमेश याने त्याला शिवीगाळ केले. शनिवारी रात्री गोरख फिर्यादी महिलेच्या घरी आला. माझ्या भावाला कामाचे पैसे का मागितले, असे म्हणत गोरख याने फिर्यादीच्या मुलीला घराबाहेर ओढून तिच्याशी गैरवर्तन केले. जातीवाचक शिवीगाळ करत गोरख याने फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून एकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे करीत आहे.

Back to top button