महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

महासंदेश : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बारामती तालुक्‍यातील एका गावामध्ये अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अभिषेक विकास रानवडे (वय 29, रा. शनिवार पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोक्‍सो) असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना 24 एप्रिलला घडली. त्यानंतर मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडूनही मुलीचा शोध सुरू होता. मुलीचा शोध घेत असतानाच मुलीच्या वडीलांचा ह्दयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यु झाला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांना मुलीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार विश्राबाग पोलिसांचे विशेष पथकाकडून शहर व जिल्ह्यात शोध सुरू होता. मात्र आरोपी सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणे अवघड जात होते.

दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी संबंधीत मुलगी ही बारामती तालुक्‍यातील मुरूम गावाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी गावामध्ये जावून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी संरक्षणासाठी मुलीला ताब्यात घेतले आहे

Back to top button