महाराष्ट्र

अविश्रांत कामांद्वारे महावितरणची ‘तौक्ते’वर मात

चक्रीवादळग्रस्त 99.96 टक्के भागात वीज सुरळीत

महासंदेश : चक्रीवादळाच्या आगमनाचा अंदाज घेत योग्य नियोजन व आपत्कालीन कृती आराखड्याची जलदगतीने अंमलबजावणी तसेच जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची विक्रमी वेळेत उभारणी व दुरुस्ती करून महावितरणने ‘तौक्ते’ चक्रीवादळावर मात केली आहे. गेल्या पंधरवड्यात टप्प्याटप्प्याने ‘तौक्ते’बाधीत प्रमुख सात जिल्ह्यांतील 35 लाख 87 हजार (99.96 टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा जलदगतीने सुरळीत केला आहे. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीला धडक देत प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड तसेच पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला होता. यामध्ये 201 उपकेंद्र, 1 हजार 342 उच्चदाब वीजवाहिन्या व 36 हजार 30 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता व हानी देखील झाली होती. त्यामुळे या सातही जिल्ह्यातील 5 हजार 575 गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला व 35 लाख 87 हजार 261 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठका घेऊन चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी पूर्वतयारीला वेग दिला होता. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपत्कालीन आराखडा तयार केला व तो क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आला. हाय अलर्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना स्थानिक पातळीवर विविध कामांचे नियोजन करून देण्यात आले होते.

 ‘तौक्ते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर राज्यातील अनेक भागात त्याचा परिणाम जाणवला. त्या भागातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत देखील झाला. मात्र प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे व कोल्हापूर या सात जिल्ह्यातील वीजयंत्रणेला अस्मानी तडाखा बसल्याने तब्बल 35 लाख 87 हजारांवर ग्राहकांची वीज खंडित झाली होती. 

करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील आव्हानात्मक परिस्थितीत या सातही जिल्ह्यात महावितरणचे 872 अभियंते, 5 हजार 446 कर्मचारी, 3 हजार 628 बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच 307 एजंसीचे 3 हजार 840 कर्मचारी अशा एकूण 13 हजार 786 कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे अविश्रांत काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button