आता राजकीय समीकरणे बदलली : खा.विखे

अहमदनगर : तत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिकेत महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे सहाय्य घेतले होते. यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. सध्या राज्यात संख्याबळ नाही तशीच अवस्था महापालिकेत असल्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी म्हटले. तसेच महापालिकेत आमचे संख्याबळ नाही व आमच्याकडे उमेदवार पण नाही. त्यामुळे आम्ही महापौरपदावर दावा करण्याचे काहीच कारण नाही. आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत, असे ही ते म्हणाले.
खा. डॉ. विखे यांनी शनिवारी महापालिकेत करोना लसीकरणा संदर्भात आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. विखे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आलेले आहे. जसे मुख्यमंत्री होताना त्यांनी जसा निकष लावला होता, तसाच निकष ते इथे सुद्धा लावतील, अशी अपेक्षा आहे, असेही खा. विखे यांनी यावेळी सांगितले.
लसीकरण मोहीम सगळ्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे असे आम्ही येथील प्रशासनाला सांगितले आहे. काल शहरातील लसीकरण केंद्रांची जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आता नव्याने बदल करण्यास सुद्धा सांगितले आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभागांमध्ये मंगल कार्यालय निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी उपकेंद्र तात्काळ सुरू केले जातील. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना तात्काळ दिली जाईल, असा निर्णय बैठकीत झाला असल्याचे खा. विखे यांनी यावेळी सांगितले.