अहमदनगरदेश-विदेशमहाराष्ट्र

आम्हाला लाँगमार्च काढावा लागू नये याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा!

महासंदेश  : सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आमंत्रण दिले आहे, त्यांच्या या भूमिकेचे खा. संभाजीराजे यांनी स्वागत केले असून,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत. कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये २१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आजच्या चर्चेत आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल. तसेच  या चर्चेतून काही साध्य झाले नाही, तर आम्ही यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुणे ते मुंबई असा लाँगमार्च काढला जाईल. हा लाँगमार्च आम्हाला काढावा लागू नये, याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा. असे  खासदार संभाजीराजे म्हणाले.  
मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या आंदोलनात संभाजीराजे यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात, याचीच उत्सुकता जास्त होती; पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणा बाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.
ते म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना देखील  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 

Back to top button