इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अक्षर पटेलला मिळणार संधी ?

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात १३ तारखेपासून दुसरा सामना सुरु होणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ आता नव्या जोमाने प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान, अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डावखुरा फिरकीपटू शाहबाझ नदीमऐवजी अक्षरचे भारतीय संघातील स्थान पक्के मानले जात आहे. पहिल्या सामन्यात निराशादायी कामगिरीनंतर झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याला बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. नदीमचा पर्याय कोण याचा निर्णय शुक्रवारपर्यंत होऊ शकतो. तथापि सामन्यासाठी फिट असलेला अक्षर पटेल हा त्याचे स्थान घेऊ शकतो. डाव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या अक्षरला मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीच संघात स्थान देण्यात येणार होते. परंतु नाणेफेकीपूर्वी सरावादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने नदीमचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश करण्यात आला. परंतु नदीम छाप पाडण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली होती, पण तो नेटवर फलंदाजी करीत आहे. उद्यापासून तो गोलंदाजीदेखील करेल, अशी अपेक्षा आहे.