महाराष्ट्र

उरवडे आग घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

महासंदेश : उरवडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस अक्वॅ टेक्नॉलॉजी कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

  सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उरवडे रस्त्यावरील या कंपनीला भीषण आग लागली होती. यामध्ये एकूण सतरा जणांचा मृत्यु झाला होता. घटनेची तीव्रता एवढी अधिक होती की आत अडकलेल्या सर्व कामगारांचा या आगीत जळून मृत्यु झाला. त्या अनुषंगाने घटनेची अधिक सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही चौकशी समिती नेमली आहे. घटनेची चौकशी करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करणे. कंपनीतील सर्व सुरक्षा यंत्रणांची चौकशी करणे तसेच कंपनीने घेतलेल्या सर्व मान्यतांची चौकशी करण्याचे संगितले आहे. त्याचबरोबर मावळ मुळशीचे दंडाधिकारी आणि समितीचे अध्यक्ष यांना घटनेच्या चौकशीसाठी लागणाऱ्या अन्य तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार दिले आहेत.

चौकशी समिती पुढीलप्रमाणे 

उपविभागीय दंडाधिकारी मावळ मुळशी (अध्यक्ष)

अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा विभाग पुणे, सहसंचालक उद्योग पुणे, उपायुक्त कामगार कल्याण विभाग, उपविभागीय पोलीस अधीक्षक मुळशी, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (ग्रामीण), मुख्य अग्निशमन अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – सदस्य.

तहसीलदार मुळशी – सदस्य/सचिव

Back to top button