उसनवारीच्या पैशावरून पती-पत्नीला शिवीगाळ

तिघा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा
अहमदनगर : उसनवारीच्या पैशावरून पती-पत्नीला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करून घरातील वस्तूंची तोडफोड केली. शहरातील हॉटेल यश पॅलेस शेजारी असलेल्या चेतन अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी भाऊसाहेब अशोक आदमने (रा. गिडेगाव ता. नेवासा, हल्ली रा. यश पॅलेस शेजारी, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे उज्वला गवळी, तिचे दोन भाऊ व जावई (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. सुपा ता. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब आदमने स्वातीक नेत्रालयात सोशल वर्कर म्हणून काम करतात. तसेच त्यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या उज्वला गवळी यांच्याकडून चार वर्षांपूर्वी वेळोवेळी दोन लाख रुपये हात उसणे घेतले होते. दोन वर्षांपूर्वी भाऊसाहेब यांनी या पैशांची परतफेड केली होती. परंतु उज्वला गवळी गेल्या एक वर्षापासून भाऊसाहेब यांना पैसे दिले नाहीत, पूर्ण पैसे द्या, असे म्हणत होत्या. शनिवारी रात्री त्या त्यांच्या दोन भाऊ व जावई यांना घेऊन भाऊसाहेब यांच्या घरी आल्या. गवळी यांच्या भावाने भाऊसाहेब यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत भाऊसाहेब यांना मारहाण केली. पैसे दिले नाहीत तर गोळ्या घालून मारेल अशी धमकी दिली. भाऊसाहेब हे कुटुंबासह कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावर घराची कुलूप तोडून संसार उपयोगी वस्तूंची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे करत आहे.