एसव्हीएस कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

महासंदेश : मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायानिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
पिरंगुटमधील एसव्हीएस रासायनिक कंपनीत जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. या कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत मंदा भाऊसाहेब कुलट (वय ४५), संगीता उल्हास गोंदे (वय ३६), गीता भारत दिवारकर (वय ३८), त्रिशला संभाजी जाधव (वय ३३, सर्व रा. उरवडे, ता. मुळशी), सुरेखा मनोहर तुपे (वय ४५, रा. करमोळी, ता. मुळशी), सुनिता राहुल साठे (वय २८, रा. भालगुडी, ता. मुळशी), अतुल लक्ष्मण साठे (वय २३, रा. भालगुडी, ता. मुळशी), सारिका चंद्रकांत कुदळे (वय ३७, रा. पवळे आळी, पिरंगुट, ता. मुळशी), धनश्री राजाराम शेलार (वय २२) संगीता अप्पा पोळेकर (वय ४२), महादेवी संजय आंबारे (वय ३५, सर्व रा. पिरगुंट कॅम्प, ता. मुळशी), अर्चना व्यंकट कवडे (३३), शीतल खोपकर, मंगल बबन मरगळे, सुमन संजय ढेबे, सीमा सचिन बोराडे (वय ३०), सचिन मदन घोडके (वय २५) यांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.