अहमदनगर

ऑनलाइन स्पर्धांमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे उल्लेखनीय यश

अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाइन स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई यांचे तर्फे आयोजित बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर एक तर रयत विज्ञान परिषदेमार्फत आयोजित विज्ञान प्रदर्शनातून राज्यस्तरावर एका विद्यार्थ्याने प्राविण्य मिळवले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष ठुबे यांनी दिली.

 बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक संघ व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई यांचेमार्फत गेली २० वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी बालवैज्ञानिक परीक्षेचे आयोजन केले जात आहे. याद्वारे प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी करोनामुळे स्पर्धेत अडचणी निर्माण झाल्या तरी स्पर्धेच्या ऑनलाइन आयोजनास परदेशी विद्यार्थ्यांसह देशभरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या चार फेऱ्यांतून विद्यालयातील ६ वीचा विद्यार्थी मयूर शंकर पवार हा  पुणे विभागातून रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. दोन हजार रुपये शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र व रौप्यपदक असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. पुणे विभागातून केवळ दोन विद्यार्थी या स्पर्धेत यशस्वी ठरले त्यापैकी एक अहमदनगर आहे, व तो मान विद्यालयास मिळाला हे विशेष. या परीक्षेसाठी देश विदेशातून जवळपास ३४ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. होमी भाभा विज्ञान केंद्रामार्फत शास्त्रज्ञांच्या तज्ज्ञ समितीद्वारे  लेखी, तोंडी, प्रकल्प सादरीकरण आदी परीक्षांतून चाळणी करून प्रज्ञावान विद्यार्थ्यांची  निवड केली जाते.

    याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रयत विज्ञान परिषदेमार्फत ऑनलाईन वैज्ञानिक प्रदर्शनाचे चालू वर्षी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यालयातील ७ वीचा विद्यार्थी मयूर सोमनाथ लोखंडे या विद्यार्थ्याने तयार केलेले बहुउपयोगी शेतीमशागतयंत्र संस्थास्तरावर राज्यपातळीवर निवडले गेले आहे.

Back to top button