अहमदनगर

करोनामुळे मृत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचे दाखले मोफत व घरपोहच देणार

अहमदनगर : महापालिका हद्दीतील रूग्णालयात करोनामुळे मृत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखला मोफत व घरपोहच देण्यात येणार आहे. महापालिकेकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी होणार्‍या गर्दीला आळा बसणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने करोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत व घरपोहच मृत्यू दाखला देण्याचा प्रारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते.

 जिल्हाभरातून करोना रूग्ण उपचार घेण्यासाठी नगर शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. दुदैवाने यात काहींचा मृत्यू होतो. अशा मृत रूग्णांची महापालिकेकडे नोंद होत असते. मृत रूग्णांवर महापालिकेकडून अत्यंसंस्कार केले जातात. मृत रूग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूच्या दाखल्यांची शासकीय, खाजगी कामांसाठी गरज भासत आहे. जुन्या महापालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी गर्दी होत होती. यामुळे संसर्ग होण्याचा धोका होता. शिवाय जिल्हाभरातून रूग्णांचे नातेवाईक दाखले घेण्यासाठी नगरला येत होते. काहीवेळा त्यांना दाखला मिळत नसल्याने माघारी जावे लागत होती. आता मनपाने पुढाकार घेत दाखले घरपोहच देण्याची व्यवस्था केल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button