करोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा – जिल्हाधिकारी डॉ. भोसले

सर्व तालुक्यांचा आठवडाभरात करणार पुन्हा दौरा; कोरोना उपाययोजनांचा घेणार आढावा
अहमदनगर: करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव हे केंद्र मानून कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात हिवरे बाजार गावाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याला मिळालेले यश पाहता त्याप्रमाणे सर्व गावांनी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिल्या आहेत. संभाव्य रुग्णांना शोधून करोना चाचण्या वाढविणे आणि संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असून तशी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करुन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले दैनंदिनरित्या तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी गाफील न राहता चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
नुकतेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील बाधित रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्यात त्यांनी अहमदनगर जिल्हयातील होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) पूर्णपणे बंद करण्याच्या आणि आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.