महाराष्ट्र

कारच्या धडकेत आई वडिलासह मुलाचा मृत्यू !

महासंदेश  :पुतणीचा विवाह दोन दिवसांवर आला होता म्हणून आई ,वडील व मुलगा असे तिघेजण कपडे खरेदी करण्यासाठी  मोटरसायकलवर गेले. बाजारात कपडे खरेदी करून परत घराकडे निघाले मात्र यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकला धडक दिली. यात आई ,वडील व मुलगा या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जुन्नर तालुक्यातील जांबूतफाटा येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश निवृत्ती लेंडे (वय ४०), सुरेखा राजेश लेंडे (वय ३५) व यश राजेश लेंडे (वय १५, सर्व रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी भटकळवाडी येथील राजेश निवृत्ती लेंडे यांच्या पुतणीचा विवाह दोन दिवसांवर आला होता म्हणून ते त्यांची पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना घेऊन नारायणगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. कपडे खरेदी करून घराकडे परतत असताना जांबूत फाट्याजवळ असलेल्या एका मॉलजवळ आले असता पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावकडून आळेफाटा दिशेला भरघाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १४ जेएच २२०६) मोटारसायकलला जोराची धडक दिली.  ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचा देखील चेंदा मेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नारायणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत

Back to top button