कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालणारी ‘ती’ टोळी जेरबंद!

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अहमदनगर : कोपरगाव शहर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या स्टील चोरणाऱ्या टोळीच्या कोपरगाव शहर पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत सात आरोपी असून ते सर्वजण खडकी येथील १८ ते २४ वयोगटातील तरुण आहेत.या टोळीकडून तब्बल १३०० किलो स्टील, एक दुचाकी, एक ॲपे रिक्षा असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गट्या ऊर्फ विशाल राजेंद्र शिंदे, दीपक अर्जुन दवंगे, मुकेश मुनीर शेख, सोमनाथ भाऊलाल सुरासे, मुकुंदा ज्ञानेश्वर पवार, पवन रमेश भालेराव, आकाश अंकुश खरात अशी ‘त्या’सात आरोपींची नावे आहेत. कोपरगाव शहर पोलिसांमध्ये दि.१९ मे रोजी राजेश शांतीलाल कोकणी यांनी साई सिटी येथील बांधकामावरून १५०० किलो स्टील चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती, तसेच कचरू भास्कर निकम ,नीरज मदनलाल कासलीवाल यांनी देखील स्टील चोरीला गेल्याची फिर्याद दाखल होती.
कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त खबऱ्याद्वारे पथकाला माहिती मिळाली की, गट्या ऊर्फ विशाल राजेंद्र शिंदे कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथे आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने वरील आपल्या सहा साथीदारांची नावे सांगितली व साईिसटी येथील काटवनात लपविलेले स्टील पोलिसांना दाखविले. पोलिसांनी या सात जणांच्या ताब्यातून १३०० किलो स्टील एक दुचाकी, एक ॲपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.