कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन!

वधु-वर आई वडीलासह कार्यालय मालकावर गुन्हा तर मंगल कार्यालय सील
अहमदनगर : तालुक्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी शेवगाव तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात येत आहे. येथील ममता लॉन्समध्ये लग्न समारंभामध्ये गर्दी झाल्याने वधु, वर, आई वडील व मंगल कार्यालयाचे मालक यांच्यावर फिर्याद दाखल करुन मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे.
तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या पथकाने निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्या सहा दुकानाच्या मालकांसह मास्क न घातलेल्या ७ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. व्यावसायिक व नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.
मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. शेवगाव तालुक्यातही आकडेवारीचे प्रमाण कासवगतीने वाढत आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात ठेवण्यासाठी तालुका प्रशासन अक्शन मोडमध्ये आले आहे. शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पोलिस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासन यांच्या मदतीने शेवगाव शहरात नियम मोडणाऱ्यावर बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्या सहा दुकान मालकांवर कारवाई करत तीन हजार रुपयाचा दंड वसूल केला. तर शहरात विनामास्क फिरर्णाया ७ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत १४०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.