कृषीमहाराष्ट्र

खतांचा कृत्रिम तुटवडा भासवुन शेतकऱ्यांची लूट..!

अहमदनगर: दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्‍यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. युरिया खत घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची झुंबड उडत आहे. युरियाचा तुटवडा असल्याने शेतकर्‍यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.


याचाच फायदा घेत तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर चढ्या दराने युरिया विकली जात आहे. २६६ रुपयांची एक गोणी ३५० रुपयांना विकली जात असून ८० ते ८५ रुपये जास्त आकारले जात आहेत. तुटवडा असल्याने नाईलाजास्तव शेतकर्‍यांना वाढीव पैसे देऊन युरिया खरेदी करण्याची वेळ आली आहे.

एकतर मागील वर्षी पासूनकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद होत्या. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्री अभावी शेतात सडूनगेला तर उरलेल्या मालास कवडीमोल दराने विक्री केल्याने झालेला खर्च देखील वसूल झाला नाही. आणि आता परत शेतकऱ्यांचीच अडणुक केली जात आहे.

काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया गोणी हवी असेल तर शेतीसाठी लागणारे इतर खते किंवा औषध घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी कृषी अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Back to top button