देश-विदेशमहाराष्ट्र

जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न

महासंदेश : हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष आणि सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर साधेपणाने आणि मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत,अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करवीर संस्थानचे युवराज खा. छत्रपती संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी किल्ले रायगडावर दि.५ व ६ जून रोजी हा सोहळा साजरा करण्यात येतो. गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने समितीचे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते किल्ले रायगडवर आले होते.
गडावर शनिवारी परंपरेनुसार सायंकाळी गडावरील गडकऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत गडपुजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली.तत्पुर्वी राजसदरेवरील मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती सभोवती आकर्षक सजावट करण्यात आली.रात्री गडदेवता शिरकाई देवीसमोर गोंधळ घालण्यात आला. होळीच्या माळावर शिवकालीन तलवारबाजी, दांडपट्टा अशा थरारक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांतुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य दिवशी आज सकाळी युवराज छत्रपती संभाजीराजे आणि यौवराज छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते रायगडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर भव्य भगवा ध्वज फडकवुन सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.यानंतर युवराज संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन झाले.त्यांच्या हस्ते उत्सव मुर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला. यावेळी रायगडावरील विठ्ठल औकीरकरांनी संभाजीराजे छत्रपतींकडे सुपुर्त केलेल्या सोन्याच्या होनची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर मेघडंबरीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून,मानाचा मुजरा करून,सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला.

यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी,तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय” अशा घोषणांनी वातावरण शिवमय केले.
राजसदरेवरील मेघडंबरी आकर्षक देशी फुलांच्या सहाय्याने सजवण्यात आली होती. गेल्या ५ वर्षांपासून पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हालवाई ट्रस्ट यांच्या वतीने फुलांची सजावट करण्यात येते.यानंतर राजसदरेवरून श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींनी समस्थ शिवभक्तांना मार्गदर्शन केले.

यानंतर शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह युवराज संभाजीराजे यांनी जगदीश्वर मंदिराकडे प्रस्थान करुन, शंभुमहादेवाचे दर्शन घेतले. तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन करुन, या सोहळ्याची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सांवत यांनी तर सूत्रसंचालन सदस्य सुखदेव गिरी यांनी केले.

Back to top button