Travelअहमदनगरमहाराष्ट्र

जिल्हा सहकारी बँकेकडून ग्राहकांची पिळवणूक ; नियोजनाच्या अभावामुळे करोना संसर्गाला निमंत्रण

नगर, दि.२२ (प्रतिनिधी) – करोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा सहकारी बँकेच्या पाथर्डीतील मुख्य शाखेकडून ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना तासन तास बँकेच्या मुख्य गेटवर ताटकळत उभे राहावे लागते. नियोजनाअभावी गेटवर होणाऱ्या गर्दीमुळे करोनाला प्रतिबंध होण्याऐवजी निमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती दिसत आहे.

 या शाखेत कोठडीतील आरोपी सारखे  ग्राहक मुख्य गेटच्या गजांना धरून तासन्तास गेट उघडण्याची वाट पाहत असतात. तसेच अधिकारी व कर्मचारी हे अत्यंत खालच्या पातळीची व मग्रुरीची भाषा वापरत ग्राहकांना अपमानित करतात. करोमाच्या नियमांच्या नावाखाली व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या मनमानीमुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 पाथर्डी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेची मुबलक जागेत प्रशस्त इमारत आहे. इमारतीच्या सभोवती मोठे पटांगण असून चोहोबाजूंनी संरक्षण भिंत  तर राष्ट्रीय महामार्गालालागून मुख्य गेट आहे. संचालक मंडळ व लोकप्रतिनिधींच्या नात्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी या शाखेत सोयीच्या बदल्या करून आल्याने अरेरावी व मनमानी कारभाराचे किस्से नेहमीच घडत असतात. आमचे कोणीच काही करू शकत नाही या अविर्भावात शाखेतील कर्मचारी सर्वसामान्य ग्राहकांशी वाटेल तसे वागतात. राजकीय कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बँकेचा मागील दरवाजा कायम उघडा असतो. पिळवणूक होते मात्र, सर्वसामान्य नागरिकांची. कर्मचारी ग्राहकांशी मनमानी पद्धतीने वागत असल्याने ग्राहकांकडून राजकीय मंडळींवर विनाकारण रोष व्यक्त होतो.

करोना काळात संसर्ग होऊ नये म्हणून तालुका प्रशासनाने योग्य नियोजन करून ग्राहकांना जास्त वेळ बँकेत थांबावे लागणार नाही असे नियोजन करण्याच्या सूचना स्थानिक व्यवस्थापनाला दिले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम नंबरचे टोकन देऊन बँकेत येण्याची अंदाजे वेळ कळवावी त्यामुळे एकदम गर्दी होणार नाही, असे नियोजन करण्याच्या  सूचना दिल्या. मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवत व्यवस्थापनाकडून कुठलेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही.

 तालुक्यातील सर्व सहकारी सोसायटी सभासदांचे  खाते या शाखेत आहेत. त्याचबरोबर डोल, नोकरदारांचे पगार, शेतकऱ्यांचे अनुदान अशा विविध ग्राहकांची शाखेत गर्दी होते. सध्या शेतकऱ्यांना सोसायट्यां कडून  कर्जवाटप सुरू असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी सकाळीच नंबर लावण्यासाठी बँकेच्या दारात येतात. मात्र, कुठलेच नियोजन नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते.  शाखा व्यवस्थापकांनी करोना नियमाचा बागुलबुवा करत चक्क  मुख्य गेट बंद ठेवले. त्यामुळे मुख्य गेटवर शेकडो ग्राहक गर्दी करून तासन्तास उभे राहिलेले होते. आपला नंबर केव्हा लागेल किंवा बँकेत काय सुरू आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. साहेबांचा आदेश आला की गेट उघडू असे गेटवरील  सुरक्षा रक्षक  अरेरावीच्या भाषेत ग्राहकांना सांगत होता.

 साहेब बँक इमारतीचे गेट बंद करा आम्हाला बँकेच्या आवारात आम्ही सोशल डिस्टन्स ठेवून रांगा लावतो. असे गर्दीत उभे राहून संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे मुख्य गेट उघडून आम्हाला फक्त नंबरचे टोकन द्या अशा विनंत्या ग्राहकांनी व्यवस्थापनाला केल्या मात्र साहेबांनी आपली मनमानी सुरूच ठेवली.

  संतप्तत झालेल्या काही ग्राहकांनी तहसीलदारांना घटनेची माहिती दिली. बँकेच्या गेटवर गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार श्याम वाडकर त्यांनी तात्काळ बँकेकडे धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून शाखा व्यवस्थापकाला चांगली धारेवर धरले. गर्दी होऊ नये म्हणून तुम्ही् काय नियोजन केले आहे. तुमच्या सुरक्षेबरोबर  ग्राहकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे.तात्काळ गेट उघडून ग्राहकांना आतील पटांगणात सोशल डिस्टन्स्स ठेवून रांगा लावून टोकन द्या. यापुढील काळात बँकेच्या गेटवर गर्दी होणार नाही यासाठी टोकण पद्धतीचे नियोजन करा अशा सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button