अहमदनगर

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे निर्देश

अहमदनगर: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील  नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे,  जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्ाह साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. मात्र, अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात होणाऱ्या चाचण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. केवळ सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या होणाऱ्या अॅण्टीजेन चाचणी व्यतिरिक्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी किंवा बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी चाचण्या होणे आवश्यक आहे. सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button