अहमदनगर

जिल्ह्यावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट !

आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजन करण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचे आदेश

पालकमंत्री यांनी घेतला जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा

अहमदनगर : , जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करुन करोनाच्या प्रतिबंधासाठी आपण सज्ज होत आहोत, असे प्रतिपादन  जिल्ह्यात आरोग्य राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

तसेच आमदार निलेश लंके यांनी करोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले काम अभिमानास्पद असल्याचे सांगत देश आणि राज्यासाठी हे काम आदर्शवत असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.  या आरोग्य मंदिरासाठी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी सुरु केलेल्या अकराशे बेडसच्या कोविड केअर सेंटर अर्थात खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच पारनेर तालुक्याचा आढावाही घेतला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील करोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला.

 भाळवणी येथील कार्यक्रमास आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्यासह सरपंच राहुल झावरे, बाबाजी तरटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होते. 

भाळवणी येथील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आमदार लंके यांच्या कामाविषयी भरभरुन कौतुक केले. 

पालकमंत्री म्हणाले, करोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. अतिशय वेगाने ही लाट आली. ऑक्सीजन पुरवठा, लसीकरण, औषध उपलब्धता आदीबाबत नव्याने नियोजन करण्यास या लाटेने भाग पाडल्याचे ते म्हणाले.

 आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी करोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानची मोठी मदत या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असलेला ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button