Travelमहाराष्ट्र

जुन्या वादातून एकावर गोळीबार

महासंदेश : नागपूर येथे गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार झाले. मात्र, नेम चुकला म्हणून गोळी पायावर लागल्याने मोहसिन खान (वय २६) नामक तरुण बचावला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी भल्या सकाळी ही थरारक घटना घडली.


पिस्तुलातून गोळी झाडून मोहसिनची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये पाच आरोपींचा समावेश आहे. त्यातील मुशिफ आणि अल्ताफ मिर्झा ही दोन नावे उघड झाली आहे.
जुन्या वादातून ही घटना घडली, सकाळची वेळ असली तरी मॉर्निंग वॉकला तसेच नाश्ता करण्यासाठी निघालेल्यांची गीतांजली चाैकात बऱ्यापैकी गर्दी होती. गोळीबार झाल्याचे लक्षात आल्याने एकच आरडाओरड झाली. त्यामुळे आरोपी कारमध्ये बसून पळून गेले. माहिती कळताच गणेशपेठ, तहसील पोलिसांचा ताफा तिकडे धावला. तोपर्यंत मोहसिनच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात पोहचवले होते.


उपचार झाल्यानंतर तहसील पोलिसांनी मोहसिनची जबाबवजा तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपी मुशिफ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही मोहसिनकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली.

Back to top button