कृषीमहाराष्ट्र

जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा जाण्याची शक्यता

महासंदेश : मान्सून यंदा केरळात दाखल झाल्यापासून राज्यात वेगाने प्रगती करणाऱ्या मान्सूनचा वेग उत्तर भारतात दाखल झाल्यापासून मंदावला आहे. मेडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ), पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स), मोसमी वाऱ्यांचा मंद वेग आणि समुद्रात कमी दाबाचा अभाव यामुळे मान्सून सध्या दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सीमेवर थबकला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा जाण्याची शक्यता हवामान विभागासह तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, देशात ३० जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावलेला राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनने केरळात निर्धारित वेळेच्या दोन दिवस उशिरा म्हणजे तीन जून रोजी प्रवेश केला. नंतर मात्र वेगाने प्रगती करत निर्धारित वेळेच्या सात दिवस आधीच मान्सूनने पूर्व, मध्य भारत पादाक्रांत करत वायव्य भारतापर्यंत मजल मारली. सध्या बारमेर, भिलवारा, ढोलपूर, अलिगड, मीरत, अंबाला ते अमृतसर अशी नैऋत्य मान्सूनची उत्तरी सीमा आहे. गेल्या सात दिवसांपासून मान्सून याच सीमेवर थबकलेला आहे. मान्सूनसाठी आ‌वश्यक मानली जाणारी व हिंदी महासागरात एमजेओ ही हवामानासंबंधीची दोलायमानता अनुकूल नाही. त्यामुळे राज्यात ३० जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आठ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली असून बहुतांश जिल्ह्यांत पेरण्या रखडल्या आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र १५ जूननंतर जोर ओसरला. सध्या ८ जिल्ह्यांत जूनच्या सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट पडली असून,  अहमदनगर- ६ टक्के, धुळे- ४० टक्के, जळगाव- १५ टक्के, नंदुरबार- ४१ टक्के, नाशिक- ३ टक्के, सोलापूर- १७ टक्के, अकोला- ४८, बुलडाणा- १२ टक्के आहे.

Back to top button