महाराष्ट्र

जून महिन्यातच ‘या’ २३ गावांचा महापालिकेत समावेश होण्याची शक्यता?

महासंदेश : महापालिकेची आगामी निवडणूक पाहता निवडणूक आयोगाने स्थानिक संस्थेच्या हद्दीत बदल  करावयाचे असल्यास ३० जून पूर्वी प्रसिद्ध करण्याबाबत नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यास विभागीय आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला असल्याने जून महिना संपण्यापूर्वी वाघोलीसह २३ गावांचा महापालिकेत समावेश होण्याची शक्यता आहे.

      मागील तीन वर्षांपासून वाघोलीसह २३ गावे समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरु असताना अखेर शासनाने या गावांचा महापालिकेत समावेशासंदर्भात मसुदा तयार करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या. विभागीय आयुक्तांनी प्राप्त हरकती व सूचनांची ऑनलाईन सुनावणी देखील घेतली. कोरोना परिस्थितीमुळे मध्यंतरी उशीर झाला होता. अखेर विभागीय आयुक्तांनी २३ गावांच्या समावेशाचा शासनाकडे अहवाल पाठविला आहे.

      पुणे महापालिकेची फेब्रुवारी २०२२ निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्यापूर्वी ६ महिने अगोदरच्या कालावधीमध्ये तिच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाहीत त्याचबरोबर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये बदल करावयाचे असल्यास ते ३० जून २०२१ पूर्वी अंतरिमरित्या प्रसिद्ध करण्यात यावे. ३० जून नंतर सदर स्थानिक संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही बदल केले जाणार नाही असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागास मागील महिन्यात पाठविले आहे.

      विभागीय आयुक्तांनी २३ गावांचा शासनाकडे पाठविलेला अहवाल आणि निवडणूक आयोगाने हद्द वाढीसाठी ३० जून पर्यंत दिलेली मर्यादा पाहता २३ गावांचा महापालिकेत जून महिन्यात केव्हाही समावेश केला जाऊ शकतो. २३ गावांचा समावेश केला गेला नाही तर आगामी फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीपासून २३ गावे वंचित रहातील. निवडणूकप्रक्रिया पूर्ण झाल्यावरच हद्दीचा विस्तार करता येईल.

Back to top button