अहमदनगर

डिझेल चोरताना चौघा जणांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले

अहमदनगर – डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचे सील तोडून डिझेल चोरताना चौघा जणांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. केडगाव येथील मतकर मळा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

बिभीषण सोमनाथ कातकडे (रा. गोमळवाडा, ता. शिरूर कासार, हल्ली रा. लोंढेमळा, केडगाव), तुकाराम श्रीधर पाटील (रा. गोमळवाडा), भागवत दादाराव तांबे (रा. राक्षसभूवन, ता. शिरूर कासार), हनुमान सुभाष सुरे (रा. गोमळवाडा, ता. शिरूर कासार) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत, भारत इंगळे हे दोघे केडगाव परिसरात मंगळवारी पहाटे खासगी वाहनाने रात्रीची गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली की, केडगाव परिसरात टँकरमधून डिझेलची चोरी केली जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मतकर मळा परिसरात संरक्षण कंपाऊंड असलेल्या एका प्लॉटमध्ये छापा टाकला असता तेथे चार जण टँकर मधून डिझेलची चोरी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button