महाराष्ट्र

‘तर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतील’: छत्रपती संभाजी राजे

अहमदनगर: ‘सर्वपक्षीय नेते एकत्र आले तर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतील. ३० टक्के समाज श्रीमंत असेल, त्यांना काही नको. मलाही यातून काही मिळवायचे नाही. ७० टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांच्यासाठी सवलती हव्या आहेत. आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी जे आरक्षण दिले होते, ते सर्व समाजातील गरीबांसाठी होते. त्यांच्याच आदर्श घेऊन आम्हाला बहुजन समाज जोडायचा आहे. मराठा समाजाला तेव्हा मिळालेले आरक्षण नंतर मागे पडले. ते मिळविण्यासाठी आता लढा सुरू आहे.असे प्रतिपादन छत्रपती संभाजी राजे यांनी केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी काढलेला संवाद दौऱ्यात काल ते जामखेड येथे बोलत होते.
ते म्हणाले की, मराठा आरक्षण लढ्यात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. केंद्र सरकराने यासाठी अध्यादेश  काढावा. त्यानंतर हा कायदा मंजूर करून घ्यावा, हा पर्याय खुला आहे. त्याला काही अवधी लागू शकतो. त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या हातात जे देता येणे शक्य आहे, ते द्यावे. त्यामुळे पूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चांतील मागण्यांपैकी सहा प्रमुख मागण्या आम्ही पुढे ठेवल्या आहेत. त्यातीलच सारथी संस्थेसंबंधीची आहे. राज्यात जशी बार्टी, महाज्योती या संस्था विविध समाजासाठी आहेत, तशीच सारथीही सक्षम व्हावी, अशी आमची मागणी आहे. आरक्षण मिळेपर्यंत या संस्थेमार्फत काही लाभ गरीब मराठा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Back to top button