अहमदनगर

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’

अहमदनगर:  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. या लाटेत आिॅक्सजनची गरज अधिक प्रमाणात लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अवलंबिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. याशिवाय, जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ.भोसले म्हणाले,  सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सर्व जिल्ह्यात नवे निर्बंध लागू झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातही स्तर-३ चे निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता आपणाला किमान २३० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असा अंदाज आहे. त्याची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.  तिसऱ्या लाटेत संभाव्य रुग्णांची संख्या जास्त असेल, त्यामुळे किमान तीन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असेल, असे नियोजन करुन जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तो आपण लवकरच राज्य शासनाला सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Back to top button