अहमदनगरमहाराष्ट्र

‘तो’ सामाजिक कार्यकर्ता जेरबंद

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून ३० हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अरुण रोडेला पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी रंगेहाथ पकडले.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही रोडे तहसीलदार देवरे यांना धमकावत होता. माझ्यावर गुन्हा दाखल करु नका, अन्यथा तुम्हाला मी पाहून घेईन. असे तो वारंवार म्हणत होता. झालेल्या या सर्व प्रकाराचे देवरे यांच्यासह तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी ध्वनीचित्रमुद्रण केले आहे.

        याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी माहिती दिली की, अन्याय निर्मूलन समितीचा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तालुक्यातील नदीपात्रांमधील वाळू उपसा व तहसील कार्यालयातील इतर कामकाजाविषयी वारंवार तक्रारी करीत असे. या तक्रारींना स्थानिक वर्तमानपत्रे,वृत्त वाहिन्या, समाज माध्यमातून प्रसिद्धी देऊन संबंधित बातम्या रात्री उशिरा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रमणध्वनीवर पाठवत असे व असे प्रकार थांबवण्यासाठी देवरे यांच्याकडे पैश्याची मागणी करीत असे.
 महसूल विभागाच्या पथकाने १४ जून रोजी,बेकायदेशीररित्या गौण खनिजाची वाहतूक करणारी गाडी पकडली होती.सदर गाडी कोणतीही कारवाई न करता सोडून द्यावी अशी मागणी रोडे याने केली.मात्र देवरे यांनी कारवाईशिवाय गाडी सोडण्यास नकार दिला.यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान, आपल्याविषयी अनेक तक्रारी आहेत.महसूलमंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत.आपण मला दरमहा पन्नास हजार रुपये दिले तर सर्व तक्रारी मागे घेतो असा प्रस्ताव रोडे याने देवरे यांच्यासमोर ठेवला. मात्र मी नियमात काम करते. तुम्ही केलेल्या तक्रारींचे स्पष्टीकरण मी वरिष्ठांना देईल. असे देवरे यांनी रोडेला सुनावले. त्यानंतरही रोडेने तहसीलदार देवरे यांच्या भ्रमणध्वनीवर रात्री अपरात्री संदेश पाठवणे थांबवले नाही.त्यामुळे तहसीलदार देवरे यांनी याप्रकाराची कल्पना पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिली.खंडणी देण्याचे कबूल करा. खंडणी स्विकारताना रोडेला पकडता येईल असे श्रीमती देवरे यांना बळप यांनी सुचवले.
सुरूवातीला रोडेने पन्नास हजार रुपये मागितले. तहसिलदार देवरे यांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्याने रोडेने तुम्हाला शक्य आहेत तेव्हढे पैसे द्या अशी मागणी केली. तहसीलदार देवरे यांनी तशी तयारी दर्शवल्यावर रोडे आज पैसे नेण्यासाठी तहसील कार्यालयात आला होता. देवरे यांनी तशी कल्पना पोलिसांना दिली. तहसीलदार देवरे यांनी दिलेले तीस हजार रुपये,त्यांच्या दालनाबाहेर मोजत असतानाच रोडेला रंगेहाथ पकडले.

Back to top button