अहमदनगर

‘त्या’पाणी योजनेची थकबाकी तब्बल साडेसहा कोटी!; महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील दुष्काळपिडीत तळेगाव भागातील २१ गावांना तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची वीज बिल थकबाकी ६ कोटी ६३ लाख ९१ हजार १५० रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे महावितरणने बिल थकबाकी वसुलीसाठी योजनेचे वीज कनेक्शन पुन्हा तोडले. योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने तळेगाव भागातील २१ लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मे महिन्याचे वडगावपान पंपिंग स्टेशनचे चालू वीज बिल ५ लाख ९ हजार ५४६ रुपये, तर निबांळे जॅकवेलचे वीज बिल ६ लाख ९४ हजार २४३ रुपये आहे. तर निंबाळे जॅकवेल व वडगावपान पंपिंग स्टेशनची एकूण वीज बिल थकबाकी ६ कोटी ६३ लाख ९१ हजार १५० रुपयांवर पोहचली आहे. वीज बिल वसुलीसाठी महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याचे योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले. तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा केली जात नाही. त्यामुळे या योजनेची वीज बिल थकबाकी ६ कोटी ६३ लाख ९१ हजार १५० रुपयांवर पोहचली.
योजना चालविण्यासाठी येणारा खर्च व दरमहा येणारे वीज बिल भरण्याकामी आर्थिक अडचण निर्माण होते. पाणी सर्वांनाच हवे, मात्र ‘पाणीपट्टी’ नको, या मानसिकतेने अनेकांना ग्रासले. त्यामुळे योजना चालविण्यात आर्थिक अडचण निर्माण होते. शिवाय पाणीपट्टी भरणाऱ्या नळकनेक्शन धारकांना नियमित पाणी मिळत नाही. काही ग्रामपंचायतीतर पाणीपट्टीचा भार हलका करण्यासाठी नळकनेक्शनची संख्या दडवीत आहेत.
योजनेद्वारे लाभार्थी गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी व वीज बिल भरण्यासाठी लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या ठरवून दिलेल्या रकमा थकबाकीसह भराव्यात, असे आवाहन योजना समितीचे अध्यक्ष प्रभाकर कांदळकर व सचिव सुरेश मंडलिक यांनी केले आहे.

Back to top button