अहमदनगरमहाराष्ट्र

‘त्या’ आस्थापना बंद करा;विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचना

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करुन उपाययोजना गतीने राबवा आणि कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करण्याची कठोर कारवाई करा, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
 
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त गमे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या रुग्णवाढीची कारणे शोधून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे, असे सांगून श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यात गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांवर त्या-त्या क्षेत्रातील प्राधिकरणांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत लक्ष ठेवले गेले पाहिजे. विविध ठिकाणची पथके तात्काळ कार्यरत करा तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या आस्थापना कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नाहीत, त्या बंद (सील) करण्याची कारवाई करा. कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना सवलत देऊ नका. रुग्णसंख्या या प्रमाणात वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Back to top button