‘त्या’ दोघांनी खाद्यतेलाचा ट्रकच केला गायब !

अहमदनगर : गुजरात येथून खाद्यतेल घेऊन पुण्याला निघालेला ट्रक पुण्याला न पाठविता त्या तेलाची परस्पर विल्ह्येवाट लावून गुजरात येथील व्यापार्याला तब्बल ३१ लाख रुपयांना चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान तेलाचा ट्रक पुणे येथे न आल्याने त्या व्यापार्याने गुजरातच्या व्यापार्यास याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत गुजरातच्या व्यापार्याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगात तपास सुरू केला असून खाद्यतेलाच्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रक मध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजण घेऊन येत होते. ट्रक मधील तेलाचे डबे पुणे येथील एका व्यापार्याला पोहोच करायचे होते. हा माल पुणे येथे पोहोचविण्याऐवजी या दोघांनी परस्पर गायब केला. आपला माल पुणे येथे पोहोचला नसल्याचे समजल्याने गुजरात येथील व्यापार्याने याबाबत चौकशी केली. चौकशीत मालाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन संगमनेरच्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तेलाच्या ट्रकसह दोघे जण फरार आहेत.