अहमदनगर

‘त्या’ पोलिसांच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

महासंदेस : श्रीगोंदा शहरातील कानन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रकार सव्वा महिन्यापूर्वी घडला होता. संबंधित पंपचालकाने थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच घटनेवरुन माजी आमदार राहुल जगताप यांनीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र देत चौकशीची मागणी केली होती. त्याची दखल घेत वळसे पाटील यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

कानन पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विजय आनंदकर व पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी ५ मे २०२१ रोजी दमदाटी केली होती. त्यानंतर पेट्रोल पंपचालकाने गृहमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तसेच सामान्यांना धमकावणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी हा प्रश्‍न चर्चेतून सोडविला जाईल, असे सांगितले होते.

दरम्यान, पंपचालकाच्या तक्रारीसोबतच माजी आमदार जगताप हेही एका पेट्रोलपंपाचे मालक असल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र गृहमंत्र्यांना दिले होते. या पत्राची दखल घेत गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

Back to top button