अहमदनगर

दहशत निर्माण करणार्‍या आकाश शिंदेच्या टोळीविरोधात मोक्का

अहमदनगर – संघटीत गुन्हे करून तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत आपली दहशत निर्माण करणार्‍या आकाश शिंदे (रा. विळद ता. नगर) टोळीविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शिंदे टोळीमध्ये एकुण सहा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. आरोपीमध्ये टोळीप्रमुख आकाश पांडुरंग शिंदे (वय 26), टोळी सदस्य महेश मनाजी ऊर्फ मनोहर शिंदे (वय 28), गणेश रमेश शिंदे (वय 30), सागर संजय शिंदे (वय 27 सर्व रा. विळद ता. नगर), स्वप्निल ऊर्फ आदित्य अशोक पाखरे (वय 25 रा. नागरदेवळे ता. नगर), किशोर ऊर्फ ईश्वर शिंदे (वय 24 रा. देहरे ता. नगर) यांचा समावेश आहे. या टोळीविरोधात एमआयडीसी, तोफखाना, नगर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मे 2021 मध्ये दरोड्याचा गुन्हा घडला होता. सदरचा गुन्हा आकाश शिंदे टोळीने केला असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली.

शिंदे टोळीने इतरही काही गुन्हे संघटीतपणे केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शिंदे टोळीविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी 28 ऑगस्ट 2021 रोजी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून शिंदे टोळीविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button