अहमदनगरमहाराष्ट्र

दातीर यांची कशी झाली हत्या ; किती रुपयांना दिली होती सुपारी ; कसा रचला कट ; पोलिसांनी किती पानांचे दोषारोप पत्र केले दाखल; वाचा सविस्तर

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.
मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असले बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळवून सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला. यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता. बीनंदनकी जिल्हा फत्तेपूर उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना व्यापारी अनिल गावडे याने आरोपी कान्हु मोरे यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचा महत्वपूर्ण तपास

मिटके यांनी सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले. व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचेसह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.

असा घडला घटनाक्रम
दि. 06/04/2021 रोजी 363,302 प्रमाणे गुन्हा दाखल. दि. 07/04/2021 कान्हु मोरे व साथीदारांनी गुन्हा केल्याचे उघड. दि. 08/04/2021 अर्जुन विक्रम माळी व तोफिक मुक्तार शेख यास अटक .दि. 18/04/2021 रोजी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून अटक. दि. 27/04/2021अक्षय कुलथे यास उत्तरप्रदेश येथून अटक. दि. 11/06/2021 व्यापारी अनिल गावडे यास सहआरोपी दि 06/07/2021रोजी आरोपी कान्हु मोरे याचेसह अन्य 4 आरोपींविरोधात दोषारोप पत्र.

64 साक्षीदारासह भक्कम पुरावे….
2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि 64 साक्षीदारांची साक्ष आणि अन्य कागदोपत्री पुरावे गोळा करून भक्कम पुराव्याची जंत्री पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दोषारोपपत्रात सादर केली आहे.

असा रचला कट

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे याचे व मयत पत्रकार रोहिदास दातीर यांचे गणेगाव येथील शेती वरून वाद होते त्या वादावरून मुख्य आरोपी कान्हु मोरे याने साथीदार तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी यांना राहुरी येथे बोलावून घेवून माझे पत्रकार रोहिदास दातीर याचे बरोबर गणेगाव येथील जमिनीवरून वाद असून त्याचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारायचे आहे असे सांगून साथीदारांना प्रत्येकी दहा हजार रुपये ॲडव्हान्स देऊन स्वतःची स्कॉर्पिओ गाडी त्याकरिता वापरून राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरून पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण केले व दरडगाव येथील फॉरेस्ट मध्ये निर्जनस्थळी घेऊन जाऊन पत्रकार दातीर यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला व जनतेच्या दहशत व भीती होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये म्हणून मयताचे प्रेत राहुरी येथील रोटरी ब्लड बँकेचे जवळ टाकून पळून गेले.

अशी आहेत आरोपींची नावे
1)कान्हु गंगाराम मोरे
2)लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी
3)तोफिक मुक्तार शेख
4)अक्षय सुरेश कुलथे
5)अनिल जनार्धन गावडे

राज्यभर गाजले प्रकरण
‌ पत्रकार रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते होते त्यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले होते.आरोपीच्या अटकेकरिता विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटना यांनी निवेदने दिली होती.

Back to top button