दीड लाखाचा ऐवज लंपास

दीड लाखाचा ऐवज लंपास
नगर, दि.6 (प्रतिनिधी) – अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक करून घरात ठेवलेले सुमारे 1 लाख 65 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथे घडली. याप्रकरणी विलास बलभिम कदम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बनपिंप्री येथे हातवळण रस्त्यावर कदम यांचे घर आहे. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असताना कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे मनीमंगळसूत्र, गळ्यातील डोरले, कानातील वेल, झुबे, नाकातील नथ, कानातील रिंगा, लहान मुलाच्या गळ्यातील बदाम, चांदीचे जोडवे, पैंजण, अंगठ्या व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून लंपास झाले. याबाबत कदम यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.