अहमदनगर

दुकान मलकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

‘या’ दुकानदारा विरोधात कोतवालीत गुन्हा दाखल

महासंदेश : लिफ्टमधून जड सामानाची वाहतूक करणार्‍या कामगारांना दुकान मालकाने संरक्षणाचे साहित्य न पुरविल्यामुळे व निष्काळजीपणामुळे शिवम भाऊसाहेब झेंडे (वय 19 रा. चिखली ता. श्रीगोंदा) या कामगार युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिवमचे वडिल भाऊसाहेब एकनाथ झेंडे (वय 50 रा. चिखली) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अभय मशिनरीचे मालक अभय रसिकलाल लुणिया (रा. मार्केट यार्ड, अहमदनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी मार्केट यार्ड येथील अभय मशिनरी या दुकानातील लिफ्ट दुसर्‍या मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. ओंकार अरूण निमसे (वय 19), प्रिया सचिन पवार (वय 40) व शीतल शेषेराव चिमखडे (वय 24) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
फिर्यादी भाऊसाहेब झेंडे गेल्या 20 वर्षांपासून अभय मशिनरी दुकानात कामाला आहेत. त्यांचा मुलगा शिवम दोन वर्षांपासून तेथे कामाला होता. शनिवारी ते नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता कामावर आले होते. दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान दुकान मालक लुणिया याने सांगितल्याप्रमाणे कामगारांनी फिटींग मटेरिलयचे एकुण 20 ते 22 बॉक्स लिफ्टमध्ये भरले होते. लिफ्टमध्ये बॉक्ससोबत शिवम झेंडे, ओंकार निमसे, प्रिया पवार, शितल चिमखाडे हे होते. लिफ्ट दुसर्‍या मजल्यावर गेल्यानंतर अचानक तुटून खाली कोसळली. यात शिवम याचा मृत्यू झाला तर अन्य तीन कामगार जखमी झाले आहेत.
दरम्यान अभय मशिनरी दुकानाचा मालक अभय लुणिया याच्या निष्काळजीपणामुळे व त्याने कामगारांना संरक्षण साहित्य न पुरविल्यामुळे माझ्या मुलगा शिवम मयत झाला व इतर कामगार जखमी झाले असल्याचे भाऊसाहेब झेंडे यांंनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Back to top button