Travelअहमदनगर

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र, काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. तसेच प्रतिबंधात्मक नियममाचे पालन होताना त्यांच्याकडून होतांना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून करोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. ग्रामस्तरीय अधिकारी, पोलीस पाटील यांच्या मार्फत ही माहिती तातडीने तालुकास्तरीय यंत्रणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच हिवरे पॅटर्ननुसार गावामध्ये कार्यरत पथकांनी अधिक कार्यतत्पर होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.  सध्या जरी रुग्णसंख्येत घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. अनेक गावात तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषद क्षेत्रात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्या-त्या भागातील व्यापारी, उद्योजक, आस्थापना यांचे प्रमुख यांनी स्वताहून पुढाकार घेऊन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी या आस्थापना स्वताहून लवकर बंद केल्या जात आहेत तसेच आठवड्याच्या शेवटी शनिवारी अथवा रविवारी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे  निश्चित कौतुक असून नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

Back to top button