अहमदनगर

दोन गटात सशस्त्र हाणामारी !

सात जखमी : परस्पर विरोधी फिर्याद दाखल
अहमदनगर : वाढदिवसानिमित्त सुरू असलेला गोंधळ कमी करा, असे सांगितल्याच्या कारणातून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना संगमनेर शहरातील नाटकी नाला परिसरातील इस्लामपुरा येथे घडली. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील इस्लामपुरा येथे राहणाऱ्या हूजेज बागवान यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रात्री सुरू होता. यावेळी मोठा गोंधळ चालू असताना अमजद दाऊद सय्यद व त्याचा भाऊ संबंधितांना समजावून सांगण्यासाठी गेले. याचा राग आल्याने काही युवकांनी लाठ्या-काठ्या हॉकी स्टिक याच्या साहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याची माहिती समजताच दुसऱ्या गटाचे युवकही जमा झाले. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार शास्त्रांचा वापर करण्यात आला. यात सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्या आहेत. 

Back to top button