अहमदनगरमहाराष्ट्र

नगर तालुक्याचा युरीया परस्पर दुसरीकडे वाटला!

अहमदनगर : नगर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी बफर स्टॉक करून ठेवलेल्या युरीयाच्या साठ्यापैकी २०५ मेट्रीक साठा अन्य तालुक्यांना परस्पर वाटप करण्यात आला आहे. हा उद्योग कृषी विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . या प्रकरणी थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची बैठक पारपडली. यावेळी नगर तालुक्यातील युरीया खताचा बफर स्टॉकचा विषय काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या खतांच्या नियंत्रण समितीच्या बैठकीत नगर तालुक्यासाठी ६७६ मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे निर्देश कृषी उद्योग विकास मंडळाला देण्यात आले होते. मात्र, या मंडळाच्या अधिकार्‍यांनी परस्पर तालुक्याचा युरीया खतांचा स्टॉक परस्पर अन्य तालुक्यांना वाटप केला.

याबाबत कोणालाही कल्पना दिली नाही. याबाबत उघड झाल्यानंतर महामंडळाच्या संबंधीत अधिकार्‍याला स्थायी समितीच्या बैठकीला बोलविण्यात आले होते. मात्र, संबंधीत अधिकारी बैठकीकडे फिरकलेही नाहीत. दरम्यान, युरिया खताची परस्पर विल्हेवाट प्रकरणी जिल्हा परिषद कृषी विभाग जिल्हाधिकारी यांच्या सनियंत्रण समितीकडे तक्रार करणार आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य कार्ले हे राज्याच्या कृषी मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

अर्धवेळ परिचारिकांना नेमणुकीच्या गावात काम
जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिका यांना महिन्याला केवळ तीन हजार मानधन देण्यात येत असून त्यांना नेमणुकीच्या गावाऐवजी दुसर्‍या गावात कामासाठी पाठविण्यात येत आहे. शंभर रुपये रोज मिळणार्‍या या अर्धवेळ परिचारिकांना दुसर्‍या गावात जाण्यासाठी पदरमोड करावी लागत असल्याने या पुढे या परिचारीकांना त्यांना नेमणूक असणार्‍या गावात काम देण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समिती ठराव करून शासनाला पाठविणार आहे. हा विषय सदस्य कार्ले यांनी काढला. तसेच चांगले काम करणार्‍या अर्धवेळ परिचारिकांना शासनाने वर्ग ४ सेवेत सामावून घेण्याची मागणी कार्ले यांनी यावेळी केली.

Back to top button