Travelअहमदनगर

नगर शहरातील बाजारपेठ सुरू होणार?

जिल्हा प्रशासनाने घेतली शहरातील व्यापाऱ्यांची बैठक!

अहमदनगर : आडते बाजार, दाळ मंडई, मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्यावतीने बाजारपेठा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने मार्केट यार्ड येथील मर्चंट बँक येथे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना त्यांना दिल्या व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्याकडे बाजारपेठेतील वाहतुकीचा व कोरोना नियमाचा आराखडा दिला. शासकीय नियमांचे पालन करण्याची हमी पत्र ही दिले. या आराखड्याचा विचार करून अटी व शर्तीनुसार बाजारपेठ उघडण्याचा निर्णय घेऊन असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्यापाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले व्यापाऱ्यांशी चर्चा करताना म्हणाले की, रुग्णसंख्या कमी होणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू शहराकडून ग्रामीण भागाकडे वाढत गेला आहे. पहिला लाटेमध्ये कोरोनाचे ७५ हजार कोरोनारुग्ण सापडले होते. याच बरोबर दुसऱ्याला लाटेतही कोरोनाचे उच्चांक गाठला आहे. या लाटेमध्ये १ लाख ७५ हजार रुग्ण सापडले. यामध्ये ऑक्सिजनसह बेडचा तुटवडा जाणवला, मृत्यूची संख्याही वाढली. जुलै महिन्यामध्ये तज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे तसेच बाजारपेठा खुल्या केल्या नंतर शासनाच्या नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. मास्क वापरणे,सोशल डिस्टंसिंग, नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कालपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्याही कमी होत आहे, आता दररोज २० हजार नागरिकांची कोविड तपासणी केली जाते. प्रशासनालाही वाटते की, बाजारपेठा व व्यापार सुरळीत रहावा. परंतु कोरोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. किराणा, भुसार व किरकोळ बाजाराचे निर्बंध कसे शिथील करता येईल याचा निर्णय लवकरच घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी झालेल्या बैठकीत दिली.

Back to top button