नगर शहरात विकेंड लॉकडाऊनचा फज्जा!

अहमदनगर: दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध दुकाने, आस्थापना यांना निर्बंध लावलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सर्व दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.तर शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन घोषीत करण्यात आला असून या दोन दिवस केवळ वैद्यकीय सेवा असणारी दुकाने, मेडीकल आदी सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेशीत केले आहे. मात्र असे असतानाही शनिवारी मुकुंदनगर, गोविंदपूरा, फकीरवाडा परिसरात काही दुकाने उडी असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली. त्यानुसार स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांनी महापालिकेच्या दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्याशी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली व संयुक्त कारवाईची मोहीम आखली. त्यानुसार शनिवारी दुपारी ही कारवाई सुरू करण्यात आली. यात गोविंदपूरा परिसरात ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर मुकुंदनगर परिसरात मेन चौक ते दरबार चौक परिसरात १० दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस व मनपाकडून दुकानदारंवर धडक कारवाईची मोहीम सुरू झाल्याचे कळताच या परिसरातील दुकाने सुरू ठेवलेल्या दुकान मालकांमध्ये धावपळ उडाली. अनेकांनी तातडीने दुकाने बंद केली.
प्रशासनाने जारी केलेल्या कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईचे काहीजण स्वागत करत आहेत तर काहीजण सर्वांना समान न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत संताप देखील व्यक्त करत आहेत. शहरातील कोठला, सर्जेपुरा भागात दुकाने, व्यवसाय वेळेच्या मर्यादेनंतर सुरू असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र इतर भागातील दुकानांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने आम्हीच काय गुन्हा केलाय? असा सवाल व्यापारी, व्यावसायिकांनी केला आहे.