अहमदनगर

नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी

सप्तपदी अभियानही अधिक जोमाने राबविण्याच्या सूचना

अहमदनगर : करोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती. आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले. महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या सप्तपदी सूत्रानुसार गावागावातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि.२२) रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महसूलविषयक विविध विषयांचा तपशीलवार आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल संबंधित शाखांचे प्रमुख उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या करोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महसूलसह सर्व यंत्रणा करोनाशी लढा देत होत्या. त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना करीत होत्या. त्याचबरोबर विविध विकास कामे, नागरिकांची महसूलविषयक दैनंदिन जीवनव्यवहाराशी निगडीत कामेही सुरु होती. मात्र, त्याचा वेग काहीसा कमी झाला होता. आता महसूल यंत्रणांनी या कामांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे दफ्तर तपासणी करणे, जमीनविषयक नोंदी, प्रलंबित फेरफार नोंदींचे अद्यावतीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित गौणखनिज प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामसभा ठराव,  उपतांत्रिक समिती, तालुकास्तरीय समिती यांच्या नंतर जिल्हास्तरीय समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. ग्रामसभांनी केलेल्या सकारात्मक अथवा नकारात्मक असा जो अभिप्राय असेल त्यासह सर्वच प्रस्ताव या समितीसमोर येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी कार्यवाही करावी, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.  आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट्य पूर्ण होईल, याचे नियोजन आणि त्याप्रमाणे कार्यवाही तालुकास्तरीय यंत्रणा आणि संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडून अपेक्षित आहे. एखाद्या तालुक्यात जरी उद्दिष्ट्यपूर्ती झाली नाही तर त्याचा परिणाम जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टावर होतो. त्यामुळे  याप्रकरणी तालुकास्तरीय महसूल यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Back to top button