नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात म्युकर मायकोसिसचा बळी!

अहमदनगर : एकीकडे जिल्ह्यासह राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे.तर दुसरीकडे म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे एकूणच सर्वसामान्य जनतेची ‘आगीतून फुपाट्यात ‘अशी अवस्था झाली आहे.सध्या राज्यासह जिल्ह्यात देखील म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत असताना, याआजाराने नेवासा तालुक्यातील सोनई गावात एकाचा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत सविस्तर असे की, सोनई परिसरातील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सात दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे पुणे येथे निधन झाले. तर दोघांची प्रकृती सुधारत आहे. एका रुग्णाचा धोका टळला आहे. एक रुग्ण उपचार घेऊन घरी आलेला आहे. तर दुर्दैवाने एका रुग्णाचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. कोरोनाची धास्ती काहीशी कमी झाली असतानाच आता म्युकरमायकोसिसचे हळूहळू रुग्ण समोर येऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना ‘एम्फोटोरीसीन बी’ हे इंजेक्शन उपचारासाठी वापरले जाते.मात्र रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या इंजेक्शनचा देखील आता तुटवडा निर्माण होत आहे. सामान्य रुग्णांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचारासाठी मंजुरी दिली आहे. तरीही काही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार मिळत नाहीत. ग्रामीण भागात कोरोना वाढत असतानाच म्युकरमायकोसिसचे रुग्णही समोर येत आहेत. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.