पंतप्रधान मोदींनी देश अधोगतीकडे नेला ; काँग्रेसचे राज्यात आंदोलन

महासंदेश : काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षांत देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून ,त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला आहे . त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. सात वर्षांतील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की ,नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षांतील कारभाराबाबत राज्यातील प्रत्येक विभागात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नागपूरमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत, तर खा. कुमार केतकर मोदी सरकारच्या सात वर्षांचे अपयश ऑनलाइन व्याख्यानातून उघड करतील.