महाराष्ट्र

पाण्यासाठी महिलांनी आडवला “या” मंत्र्याचा ताफा

महासंदेश : गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवला. ही घटना काल दुपारी चार वाजता जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या उचंदा येथे घडली. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोन्ही तालुक्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान उचंदा गावातील महिलांनी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून त्यांचा ताफा अडवला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.
ऐन करोना काळात गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. महिलांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या, तुम्ही पाण्याचे मंत्री आहेत. आमच्या गावात पंधरा दिवसांपासून पाणी नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक आमची समस्या ऐकून घेत नाहीत, अशा शब्दांत महिलांनी आपली व्यथा मांडली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या अडचणी जाणून घेत त्यांना समस्येचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक आणि बीडीओ यांना तातडीने पाणीटंचाई सोडविण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button