Travelअहमदनगरमहाराष्ट्र

पूर्ववैमनस्यामुळे मुलालाही रहावे लागले आरोपीच्या पिंजऱ्यात उभा !

पारनेर खून प्रकरण

अहमदनगर : नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गूढ उकलले असून, तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संग्रामने तलवारीने सपासप वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. यामुळे पूर्ववैमनस्यातून घडलेल्या हत्याकडांच्या प्रकरणात मुलालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभारहावे लागले आहे.

राजकीय वर्चस्व, आपसांतील भांडणाच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री नेमबाजांकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. करोना संसर्गाच्या पर्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायायलाने विशेष रजा मंजूर केली असून, वर्षभरापासून राजाराम नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.
राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम याच्या मनात होती. राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार आणली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजारामच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संधी संग्राम शोधत होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळ्याचे काम करणाऱ्या मजुरांना सूचना देऊन एकटाच परतत होता. ही संधी साधत संग्रामने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीचा जोरदार वार केला. एकाच वारामध्ये राजाराम जमिनीवर कोसळला. संग्रामने पुन्हा त्याच्या मानेवर आणखी दोन वार करून तो पुन्हा उसामध्ये जाऊन लपला. पहिल्याच वारामध्ये राजाराम गतप्राण झाला. वार झाल्यानंतर राजाराम याच्या तोंडातून शब्ददेखील फुटला नाही. संग्रामने ही माहिती पोलिसांना दिली.

राजाराम शेळके याच्या हत्येप्रकरणी गणेश भानुदास शेळके व अक्षय पोपट कांडेकर यांना शनिवारी अटक करण्यात आली. गणेश शेळके नगर येथे पोलिस दलात चालक पदावर कार्यरत असून, त्याला नगर येथून ताब्यात घेण्यात आले तर अक्षयला म्हसे (श्रीगोंदे) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता, न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली. ॲड.बाळासाहेब कावरे यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे.

Back to top button