अहमदनगर

प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास करोनावर मात करता येते : पोलीस अधीक्षक पाटील

नोबल हॉस्पिटलमध्ये 64 दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर महिलेची करोनावर मात
अहमदनगर :  करोना महामारीच्या काळात प्रशासकीय सेवेतील प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले. हे कर्तव्य पार पाडत असताना अनेकांना करोनाशी दोन हात करावे लागले. अशावेळी सर्वांना आधार देणे, त्यांच्या कुटुंबियांशी वेळोवेळी संवाद करण्याचे काम आम्ही केले. पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभे असून, आपल्यातील शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी गणपत धायतडक यांच्या पत्नी विमल धायतडक यांनी यशस्वीपणे करोनावर मात करीत सुमारे 64 दिवस नोबल हॉस्पिटलमध्ये उपचाराद्वारे लढा दिला. प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही कोरोनावर मात करू शकता, हे त्यांनी दाखवून दिले, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी केले.
पोलीस कर्मचारी गणपत धायतडक यांच्या पत्नी विमल धायतडक (वय-45) यांनी 64 दिवस प्रदीर्घ उपचार घेतल्यानंतर करोनावर मात केली. त्यांची जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये सदिच्छा भेट घेतली. यावेळी पो.नि. राजेंद्र पाटील, ‘नोबल’चे डॉ. बापूसाहेब कांडेकर, विजय निकम, राहुल हिरे, सचिन धायतडक, पीआय पाटील, ढेरे, सुनील पवार, हरजितसिंग वधवा, प्रदीप पंजाबी, जनक आहुजा, राहुल बजाज, करण धुप्पड, कैलास नवलानी, युनूस टेंगे, सुनील थोरात आदी उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोरोना काळात अनेकांच्या जवळचे नातेवाईक, मित्र आपणास सोडून गेले. कोरोनाबाबत प्रत्येकाच्या मनात भीती असून, हा बरा होणारा आजार आहे. या आजाराला घाबरून जाऊ नये. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. धायतडक यांनी सुमारे 64 दिवस या रोगाशी लढा देत त्याला हरवले. डॉक्टरांनी योग्य उपचार करीत त्यांना बरे करणार्‍या डॉ. कांडेकर व सहकारी डॉक्टरांचा मी विशेष आभारी आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. कांडेकर म्हणाले की, विमल धायतडक या 24 एप्रिल रोजी करोना रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्यांचा एचआरसीटीचा स्कोर शेवटच्या स्टेजला होता. ऑक्सिजन लेवलही खूपच खाली आली होती. आम्ही उपचार करतो. मात्र, त्याला रुग्णाचा प्रतिसाद मिळायला हवा. रुग्णाचा सकारात्मक दृष्टिकोन हा आजार बरा करण्यास कारणीभूत ठरतो. धायतडक या 24 तासांपैकी 18 तास पोटावर झोपून राहत. त्यामुळे त्यांची ऑक्सिजन लेव्हल वाढण्यास मदत झाली. धायतडक यांनी धीर न सोडता प्रत्येक गोष्टीला धैर्याने तोंड दिले. त्यांना कुटुंबियांनीही मोठा आधार दिला. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे देखील त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी विचारणा करीत. अखेर 64 दिवसांनंतर विमल धायतडक या कोरोनातून मुक्त झाल्या असून, आनंदाने जीवन जगू शकतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button