अहमदनगर

प्रलंबित मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर : कोरोनाच्या संकटकाळात फ्रंन्टलाईन वर्करची भूमिका बजावणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला मिळावा. शासकीय सेवेत समावून घेण्यासह आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी आयटक संलग्न अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. तसेच बुधवारपासून कोरोनाचे सर्व काम बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध समस्यांबाबत १६ व १६ जून रोजी लाक्षणिक संप आणि काम बंद आंदोलन घोषित करण्यात आले असून, या पाश्र्­वभूमीवर आंदोलन करण्यात आल.े महाराष्ट्र राज्यात ७२ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. माहितीचे अचूक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्हीएचएनएससी सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सभा ही कामे करावी लागतात. त्याकरिता त्यांना दरमहा चार हजार रुपये शासकीय आदेशानुसार मिळाले पाहिजे. पण ती रक्कम पूर्णत: मिळत नाही. याशिवाय त्यांना विविध कामांचा व इतर कामावर आधारित असलेला मोबदला कोरोना पूर्वकाळात मिळत होता. परंतु त्यांना कोरोना संबंधित काम दररोज आठ तास करुन देखील सदरची रक्कम मिळणे बंद झाली आहे. गटप्रवर्तक या पदवीधर महिला असून, त्यांना पंचवीस आशा स्वयंसेविका सनियंत्रण ठेवावे लागते. त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे.
आशा स्वयंसेविकांना घरदार सांभाळून आठवड्यातून चार दिवस दोन ते तीन तास काम करण्याचे त्यांच्या सेवाशर्ती मध्ये लिहिले आहे. मात्र २०२१ पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तक यांची प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण केंद्र व विलगीकरण कक्ष येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ तासांची ड्यूटी करावी लागत आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आशांना कोरोना संशयित व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाचे सर्व योजनांचा तसेच आशांनी केलेल्या सर्व कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तक यांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अत्याधिक बोजा पडत आहे. काही नगरपालिका मधील आशा स्वयंसेविकांना कोरोनाचे काम केल्याच्या मोबदल्यात प्रतिदिन तीनशे रुपये विशेष भत्ता देण्यात आला होता. बहुसंख्य नगरपालिकांमध्ये हा भत्ता देण्यात आलेला नाही. सध्या आशा व गटप्रवर्तक कोरोनाचे काम करीत असून, त्यांना पाचशे रुपये दररोज भत्ता मिळावा, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका कोरोनाचे काम केल्याबद्दल दरमहा एक हजार व गटप्रवर्तक यांना दरमहा पाचशे रुपये भत्ता देण्यात येत होते. हा भत्ता अत्यल्प असून देखील मार्च २०२१ नंतर ही रक्कम देण्यात आलेली नाही. ती रक्कम त्वरीत देण्यात यावी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे काम अत्यावश्यक व नियमित स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  

Back to top button