अहमदनगरमहाराष्ट्र

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदली धोरणात सुधारणा करा

अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी

अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने तालुका श्रीगोंदा येथे भेट घेवून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली धोरणात सुधारणा करुन शुद्धिपत्रक निर्गमित करण्याची मागणी संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी केली.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनानुसार प्राथमिक शिक्षका़ंच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदलीविषयी ग्रामविकासमंत्री यांना दिलेले शिफारस पत्र यावेळी सादर करण्यात आले.
आंतरजिल्हा बदली टप्पा ५ तात्काळ राबवणे व १० टक्के अट वगळून बदल्यांची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हातंर्गत बदलीसाठी ३ वर्षाच्या सेवेनंतर विनंती बदलीचा अधिकार मिळावा, रँडम /विस्थापित शिक्षकांना ३० जून दिनांकावर बदलीची संधी देण्यात यावी. मागील शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना संवर्ग ३ चा लाभ मिळावा. प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलां शिक्षिकांना बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सध्या ३० कि.मी च्या आत असणाऱ्या पतीपत्नी ला वन युनीट चा लाभ मिळावा या प्रमुख मागण्याचा समावेश आहे.
ग्रामविकास मंत्री महोदयांनी निवेदनाचा स्वीकार करुन बदली साँफ्टवेअर विकसित झाल्यानंतर लगेचच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हातंर्गत बदलीसंबधी शुद्धिपत्रक काढण्यासंबधी प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेवू असे अभिवचन शिष्टमंडळास दिले.

त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे वेतन हे दर महिन्याच्या एक तारखेला होण्यासाठी शालार्थ वेतन प्रणाली ऐवजी सीएमपी प्रणाली द्वारे वेतन अदा करणेसंबंधी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ते निर्देश देणे संबंधी विनंती करण्यात आली आहे .
संघाच्या या शिष्टमंडळात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button